दक्षिण आफ्रिकेने टेस्ट क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवताना ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२३-२५ चे विजेतेपद पटकावले आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा चषक जिंकत एक नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.
सामन्याचा थरार: लक्ष्य २८२, विजय २८२/५ – ऑस्ट्रेलियाने दिलेले २८२ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने चौथ्या डावात गाठले. आयडन मार्करमच्या शानदार १३६ धावांच्या खेळीने विजयाला मूर्त स्वरूप दिलं. कर्णधार टेम्बा बवूमा यांनी ६६ धावा करत संघाला स्थैर्य दिले.शेवटच्या टप्प्यावर काइल व्हेरेनीने निर्णायक रन घेत सामन्याची सांगता केली, आणि संघाला विजयाच्या दिशेने नेले.
संघाची भावना : “वादळात शांतता सापडली..” – कर्णधार बवूमा यांनी हा विजय “संघाच्या संयम व आत्मविश्वासाचं फलित” असल्याचं सांगितलं. प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी हा विजय केवळ एक टप्पा असून, पुढील अनेक विजयांचा प्रारंभ असल्याचं नमूद केलं. या विजयामुळे द. आफ्रिकेचा १९९८नंतरचा पहिला आयसीसी विजेतेपद मिळाले आहे, आणि “चोकर्स” ही जुनाट टीका आता इतिहास जमा झाली आहे.
क्रिकेटविश्वात उत्सव – एबी डिविलियर्स, फाफ डु प्लेसिस, युवराज सिंग यांच्यासारख्या क्रिकेट दिग्गजांनी सोशल मीडियावरून या विजयाचं अभिनंदन केलं.आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी या विजयाला “एका युगाचं प्रदर्शन” असे गौरवोद्गार काढले.
या विजयाचं महत्त्व : द. आफ्रिकेचं पहिले WTC विजेतेपद, २७ वर्षांनंतर ICC ट्रॉफीसंघाने स्वतःची नवी ओळख तयार केली आहे.