भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडचा 3-0 ने पराभव केला. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी डाव सांभाळला. शुबमन गिलने वनडे क्रिकेटमधील झंझावाती सातवं शतक ठोकलं. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आपण चांगल्या फॉर्मात असल्याचं दाखूवन दिलं. विराट कोहलीला अखेरच्या सामन्यात सूर गवसला. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. श्रेयस अय्यरने मधल्या फळीत चांगली फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. भारताने 50 षटकात सर्व गडी गमवून 356 धावा केल्या आणि विजयासाठी इंग्लंड समोर 357 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही इंग्लंडला पेलवलं नाही. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने पराभव सहन करावा लागला. इंग्लंडने सर्व गडी गमवून 214 धावा केल्या. भारताने तिसरा सामना 142 धावांनी मोठ्या फरकाने जिंकला.
भारताने विजयासाठी दिलेल्या 357 धावांचा पाठलाग करत असताना इंग्लंडच्या सुरवातीच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली होती. फिलीप आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची चांगली सुरवात केली. तर टॉम ब्रॅडनने सॉल्टसह ही धावसंख्या वाढवली. पण त्यानंतर एका मागोमाग एक गडी बाद झाले. मधल्या फळीतील फलंदाजही विशेष काही करू शकले नाही. जो रूट, जोस बटलर लवकर बाद झाले.